वेंगुर्ले/वार्ताहर-
शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांच्याकडून वेंगुर्लेत आग लागून कापड दुकानाची मोठी हानी झालेल्या दुकानाच्या चालक अल्मास अश्रफ मुजावर यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय सावरण्यासाठी तातडीचे 25 हजार रूपयाची आर्थिक मदत धनादेशाव्दारे आज बुधवारी वेंगुर्लेचे निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांचे हस्ते प्रदान करण्यांत आली. त्यामुळे दिपक केसरकर यांचा सर्वसामान्यांना नैसर्गिक आपत्तीत व संकटांत मदत करण्याचा त्यांची स्वभाव पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.वेगुर्ले शहरातील साईमंगल कार्यालय समोरील कापड दुकानाला सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून दुकानाच्या चालक अल्मास अश्रफ मुजावर यांचे मोठे नुकसान झाले. याबाबतची माहिती समजताच बऱ्याच दिवसांच्या कालावधीने सिंधुदुर्गात दाखल झालेले शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांनी या जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिवृष्टीसह अन्य महत्वाच्या कामे तातडीने पूर्ण करण्याच आदेश दिले. या बैठकिअंती वेंगुर्लेत अकस्मित आग लागून महिलेचे संपूर्ण कापड दुकान आगीमुळे भस्मसात झाल्याची माहिती वेंगुर्ले तहसिलदार प्रवीण लोकेरे यांनी त्यांना दिली असता आमदार दिपक केसरकर यांनी स्वत: वैयक्तीक रित्या 25 हजार रूपयांचा धनादेश त्या महिलेच्या नावे लिहून तो त्या महिलेस सुपुर्त करण्याची सुचना केली. त्यानुसार आज बुधवारी या नैसर्गिक आपत्ती ओढावलेल्या नुकसानग्रस्त अल्मास अश्रफ मुजावर या महिलेस वेंगुर्लेचे निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांच्या हस्ते तो धनादेश वितरीत करण्यांत आला. यावेळी शहर तलाठी डी. ए. गवते, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, माजी नगरसेविका सुमन निकम, सचिन वालावलकर यांचा समावेश होता.