पुणे / वार्ताहर :
पुणे शहरात कोयता गँगनंतर आता रुमाल गँग सक्रिय झाली आहे. सहा जणांच्या टोळक्याने तोंडाला रुमाल बांधून आज पहाटे सहकारनगर परिसरात 26 वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी पकडले आहे.
पपुल्या उर्फ दिग्वजिय वाघमारे (वय 20, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात झालेल्या खुनातील एका आरोपीला शोधण्यासाठी रुमाल बांधलेले सहा जणांचे टोळके मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहकारनगर परिसरातील वनशीव वस्तीमध्ये गेले होते. मात्र, त्यांना अपेक्षित असलेल्या आरोपीचा शोध न लागल्यामुळे शस्त्रधारी टोळक्मयाने परिसरात धुडगूस घालत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रस्त्यालगत असलेल्या रिक्षा, मोटारी, टेम्पोच्या काचा फोडून टोळक्याने परिसरात आरडाओरड केली. अचानकपणे फटाके फुटल्यासारखा आवाज आल्यामुळे स्थानिक घराबाहेर आले. त्यावेळी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते. टोळके दिसेल त्या वाहनांवर कोयत्यासह इतर शस्त्राने तोडफोड करीत होते. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत टोळक्याने तब्बल 26 वाहनांची तोडफोड केली. या वाहनांमध्ये दुचाकी, रिक्षा, कार, छोटे टेम्पो यासारख्या वाहनांचा समावेश आहे.
टोळक्याच्या धुडगुसामुळे वनशिव झोपडपट्टीतील रहिवाशांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रिक्षाचालक, कामावर जाणारा नोकरवर्ग, छोटे टेम्पो व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करीत, वाहनांचे नुकसान कसे भरुन काढायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे.