तामिळनाडूतील अनोखे गाव- कुठल्या घरात झेंडा, पोस्टर-बॅनर दिसणार नाही
तामिळनाडूतील निवडणूक प्रचार अत्यंत वेगळय़ा प्रकारचा असतो, पण याच राज्यात मदुराईला लागून असलेल्या एका गावातील तीन पिढय़ांनी देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कुठल्याच उमेदवाराला गावात प्रचाराची अनुमती दिलेली नाही. तसेच गाव-घरात राजकीय झेंडे, बॅनर, पोस्टर आणि कटआउट्स लावण्याची अनुमती नाही. तामिळनाडूच्या निवडणूक संस्कृतीचा भाग ठरलेल्या कॅश फॉर व्होटला येथे कुठलेच स्थान नाही. उमेदवार कुठलाही असो, त्याला गावाच्या सीमेवरून रवाना केले जाते.
मदुराईपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर 200 घरे आणि 600 मतदारांचे ओथावीडू हे गाव आहे. गावातील बहुतांश रहिवासी 100 वर्षांपूर्वी तिरुमंगलम येथून येत वसलेल्या 3 कुटुंबांचे वंशज आहेत. या गावाला लागून अनेक गावे आहेत. या गावांमध्ये प्रचाराचा गोंगाट आणि राजकीय पक्षांचे पोस्टर्स-बॅनर्सने झाकोळल्या गेलेल्या भिंती दिसतात. प्रचारादरम्यान ढोल-ताशे आणि फटाके फोडण्याची परंपराही सुरू आहे. पण ओथीवाडू गावात शिरताच वातावरण अत्यंत शांत दिसून येते.
या गावात चित्रपट कलाकारांबद्दलचे वेड असले तरीही चित्रपटांचे पोस्टर झळकत नाहीत. राजकीय प्रचार, भाषणांमुळे परस्परांमधील मतभेद वाढू लागतात. गावातील एकात्मता आणि सौहार्द आमच्यासाठी सर्वोपरि असल्याचे ग्रामस्थ सांगतात. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे एकसारखेच पारंपरिक पद्धतीने सीमेवरच स्वागत केले जाते. गावाच्या सीमेवरच समस्या मांडल्या जातात. राजकीय पक्ष देखील ही परंपरा जाणत असल्याने तेही याचा आदर करतात. अशाचप्रकारची काही गावे मदुराइंसह तेनी आणि विरुधुनगर जिल्हय़ात आहेत.