एकूण 347 कोटींच्या दहा प्रकल्पांना सरकारची मंजुरी : आयपीबी बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : गोवा राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) काल बुधवारी झालेल्या 33 व्या बैठकीत 347.93 कोटी ऊपयांच्या 10 गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. हे उद्योग सुरू झाल्यानंतर सुमारे 3500 रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी मंत्री माविन गुदिन्हो आणि आयडीसी चेअरमन आमदार आलेक्स लॉरेन्स यांची उपस्थिती होती.
जुने गोवेत जैव पर्यटन प्रकल्प
मंजुरी देण्यात आलेल्या 10 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्पांचे विस्तारीकरण, 3 नवीन प्रकल्प आणि 1 गोवन स्टार्टअप कंपनी असून त्यात संरक्षण क्षेत्रासाठी एटीव्ही आणि युटीव्ही यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्याशिवाय फार्मा क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी अन्न उत्पादने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. अन्य एका कंपनीतर्फे आदरातिथ्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असून जुने गोवे परिसरात जैव पर्यटन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रदूषणविरहित उद्योगांनाच प्रोत्साहन
राज्यात काही कंपन्या विदेशी सहकार्यातून उद्योग स्थापन करण्यास इच्छुक आहेत. मात्र सरकार केवळ स्वच्छ आणि प्रदूषणविरहित उद्योगांनाच प्रोत्साहन देणार असून हरित उद्योगांचे स्वागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हणुनच विद्यमान उद्योगांना सुद्धा आम्ही सर्वोच्च मानकांचे प्रदूषण नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
प्रोत्साहन धोरणात सुधारणा करणार
नवीन उद्योगांनी योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी गोवा औद्योगिक वाढ आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरण 2022 मध्ये सुधारणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पांमधून किती नोकऱ्या निर्माण झाल्या? असे विचारले असता, सदर माहिती संकलित करणे आवश्यक आहे, आणि पुढील आयडीसी बैठकीत घोषित केले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.