चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर : 28,499 कोटींचे मिळवले उत्पन्न
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक लिमिटेड यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 3986 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये हा नफा नाममात्र 0.07 टक्के इतका वाढीव दिसला आहे.
मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3983 कोटी रुपये इतका होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 4350 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. म्हणजेच तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेमध्ये पाहता चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 8.4 टक्के घसरणीत राहिला आहे.
किती देणार लाभांश
याच दरम्यान नफ्याचा निकाल जाहीर केल्यानंतर एचसीएल टेक कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने प्रति समभाग 18 रुपये इतका लाभांश देण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. आपल्या समभागधारकांना नफ्यातला काही वाटा देणे यालाच लाभांश असे म्हटले जाते.
दुसरीकडे कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 7 टक्के वाढीसह 28 हजार 499 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 26606 कोटी रुपयांचे उत्पन्न पदरात पाडून घेतले होते. या आधीच्या म्हणजे तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 28446 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेमध्ये चौथ्या तिमाहीत उत्पन्नामध्ये नाममात्र वाढ झाली आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षातील कामगिरी
याच दरम्यान कंपनीने संपूर्ण 2024 च्या आर्थिक वर्षामध्ये 1 लाख 9 हजार 913 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. जे या मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये आठ टक्के अधिक आहे. 2023 च्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 1 लाख 1 हजार 456 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 6 टक्के वाढीसह 15,710 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे.