प्रसिध्द प्रदीप ज्वेलर्स दुकानदाराला गंडा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील एका प्रसिध्द सोने दुकानदाराला त्याच्या कारागिरानेच तब्बल 4 लाखांना गंडा घातला आहे. दागिने बनवण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्किट आणि लगड घेऊन मूळ पश्चिम बंगाल येथील कारागिर पसार झाला असून त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 25 नोव्हेंबर 2020 रोजी रत्नागिरीतील प्रदीप ज्वेलर्स येथे घडली आहे. प्रलय पात्रा (सध्या मुरुगवाडा, रत्नागिरी मुळ पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. प्रदीप जैन यांनी प्रलय पात्रा याच्याकडे 50 ग्रम सोन्याचे बिस्किट आणि 34.500 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असे एकूण 4 लाख रुपयांचे 84.500 ग्रॅम सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. परंतु प्रलय ते सोन घेऊन पसार झाला. बरेच दिवस झाले तरी आपले दागिने बनवून मिळत नसल्याने प्रदीप ज्वेलर्सचे मालक प्रदीप कुंदनलाल जैन (40, आठल्ये संकुल गाडीतळ, रत्नागिरी) यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. प्रदीप जैन यांनी पोलिसांकडे तक्रार देऊन आपली फसवणूक झाल्याची कैफियत मांडली आहे. शहर पोलिसांकडे मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करून घेण्यात आली. त्यानुसार पसार झालेल्या प्रलय पात्रा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत.