तुम्ही कधी फ्लाइंग डचमॅन शिपबद्दल ऐकलं आहे का? हे भूतांचा वावर असलेले जहाज मागील 400 वर्षांपासून शापित होत समुद्रांमध्ये भटकत आहे. या शापित जहाजाबद्दल अनेक किस्से अन् कहाण्या आहेत, याचमुळे ते नेहमीच चर्चेत असते. या जहाजाला पाहणे मोठा अपशकुन मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने समुद्रात त्याला पाहिल्यास त्याचे जहाज पूर्णपणे नष्ट होते अशी वदंता आहे.
या शापित जहाजावरून जगभरात अनेक टेलिव्हिजन शो आणि लोकप्रिय चित्रपट तयार झाले आहेत. आतापर्यंत अनेकांनी फ्लाइंग डचमॅन पाहिल्याचा दावा केला आहे. पण त्यांचे दावे किती खरे आहेत हे कुणीच जाणत नाही. 20 व्या शतकातील प्रसिद्ध लेखक ‘निकोलस मॉन्सर्रेट’ यांनी दुसऱया महायुद्धादरम्यान प्रशांत महासागरात ते पाहिल्याचा दावा केला होता.
या जहाजाचे कॅप्टन हेनरीक वॅन द डेक्कन होते. त्यांना डचमॅन या नावाने देखील ओळखले जायचे. 1641 मध्ये जहाचे कॅप्टन हेनरीक वेन हॉलंडवरून स्वतःच्या जहाजासोबत ईस्ट इंडीजच्या दिशेने रवाना झाले होते. पण प्रवासानंतर ते जेव्हा हॉलंडच्या दिशेने परतू लागले तेव्हा त्यांनी मार्गात बदल केला. त्यांनी स्वतःच्या नौकेला केप ऑफ गुड होपच्या दिशेने वळविण्याचा निर्देश दिला. कॅप्टनच्या या निर्णयामुळे अन्य प्रवासी नाराज झाले, कारण त्यांना लवकर घरी पोहोचायचे होते. पुढे प्रवासात जहाजाला एका भीषण वादळाला तोंड द्यावे लागले.
या वादळात जहाज पूर्णपणे नष्ट झाले आणि यात सर्व प्रवासी मारले गेले. मरताना सर्व प्रवाशांनी या जहाजाला शापित केल्याचे बोलले जाते. तेव्हापासून हे भूताटकीयुक्त जहाज समुद्रात भटक आहे. फ्लाइंग डचमॅन जहाजाच्या रहस्याची उकल आतापर्यंत झालेली नाही. पण हे जहाज अनेकांनी पाहिल्याचा दावा केला आहे.