पिंपरी / प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरात 434 अनधिकृत होर्डिंग असून, हे होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, होर्डिंग असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या होर्डिंगला ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. रावेत येथील दुर्घटनेनंतर शहरातील 1 हजार 407 अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी रावेत येथे भलेमोठे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील होर्डिंगची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.
सोमवारी सायंकाळी रावेत परिसरात अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे आले. रावेत परिसरात जास्त प्रमाणात वारे वाहत असल्याने जाहिरात होर्डिंग पडून चार महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. एका जखमीला उपचार करून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारावर महापालिकेचे लक्ष असल्याचे सांगत आयुक्त सिंह म्हणाले, झालेली घटना दुर्देवी आहे. मात्र, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महापालिका शहरातील सर्वच जाहिरात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे.
शहरात सध्यस्थितीत महापालिकेच्या जागेत 35, बांधकाम व्यावसायिकांचे 28 आणि खासगी जागेत 1 हजार 344 असे 1 हजार 407 अधिकृत होर्डिंग आहेत. 11 एप्रिल 2022 मध्ये शहरातील अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी होर्डिंग धारकांना आकाश चिन्ह व परवाना विभागाने नोटीस दिली होती. होर्डिंग असोसिएशनने मे 2022 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने अनधिकृत होर्डिंग “जैसे थे” ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, आता सोमवारच्या घटनेनंतर न्यायालयात सर्व माहिती दिली जाईल. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी योग्य ती बाजू वकिलांमार्फत मांडण्यात येईल, असेही आयुक्त सिंह म्हणाले.