देहराडून / वृत्तसंस्था
चार दिवसांपूर्वीच बस दरीत कोसळून 27 जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना ताजी असतानाच उत्तराखंडमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला. उत्तराखंडमधील नैनिताल जिह्यातील अधौरा गावाजवळ जीप दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. नैनिताल येथे 6 जणांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. उत्तराखंडमधील गेल्या 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. याआधी गुरुवारी टिहरी गढवालच्या घणसाली-घुट्टू भागात एक वाहन दरीत कोसळून पाच जण ठार आणि तिघे जखमी झाले होते. तत्पूर्वी रविवारी बस दरीत कोसळून मध्यप्रदेशमधील 27 जणांचा मृत्यू झाला होता.