20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान आयोजन पेस्टर-नियमावली पुस्तिकेचे प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात होणाऱया भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा निश्चित झाल्या असून दि. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
काल सोमवारी 5 जुलै रोजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते 52व्या आंचिमच्या पोस्टर आणि नियमावली पुस्तिकेचे प्रकाशन दिल्लीत करण्यात आले. या कार्यक्रमाची छायाचित्रे स्वतः मंत्री जावडेकर यांनीच ट्विटरवरून शेअर केली आहेत. त्याच संदेशात त्यांनी आंचिमच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
आशिया खंडातील सर्वात जुन्या महोत्सवापैकी एक असलेल्या आंचिमसाठी गोवा हे कायमस्वरुपी केंद्र बनविण्यात आले आहे. वर्ष 2004 पासून आंचिमचे आयोजन गोव्यात करण्यात येत आहे. गतवर्षी कोरोना महामारीमुळे 51 वा महोत्सव आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला होता. सुमारे दीड वर्षानंतरही कोरोना संकट नियंत्रणात येत नसल्याने 52 वा आंचिमही आभासी पद्धतीनेच साजरा होण्याची शक्यता आहे.
यंदापासून सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार यंदाचे वर्ष हे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच यंदापासून सत्यजित रे यांच्या स्मृत्यर्थ ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.