सैन्य राजवटीचा निर्णय
वृत्तसंस्था/ नायपीडॉ
म्यानमारमधील जुंता (सैन्य) राजवटीने देशात लागू असलेली राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी 6 महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या समर्थनानंतर आणीबाणीचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे शासकीय प्रसारमाध्यमाने सोमवारी सांगितले आहे.
ग्लोबल न्यू लाइट या सरकारी वृत्तपत्रानुसार मिन आंग हलिंग यांनी बहुपक्षीय लोकशाहीवादी व्यवस्था कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे. आंग सान सू की यांच्या पक्षाचे माजी आमदार तसेच एका प्रमुख कार्यकर्त्यासह चार जणांना फासावर चढविण्यात आल्यावर आणीबाणीचा कालावधी वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात सत्तापालट घडवून आणणाऱया सैन्याच्या विरोधात अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. जूंता राजवटीकडून मृत्युदंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर अनेक देशांनी म्यानमारची निंदा केली आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीची मागणी करणाऱया शेकडो कार्यकर्त्यांना यापूर्वीच तुरुंगात डांबण्यात आले आहे.