सुकेश चंद्रशेखर याचा दावा, चौकशीची मागणी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाला आपण 60 कोटी रुपयांची लाच दिली आहे, असा आरोप लोकांची फसवणूक करण्याचा आरोप असणाऱया सुकेश चंद्रशेखर याने केला आहे. हे विधान त्याने विशेष सीबीआय न्यायालयात केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चंद्रशेखर माफीचा साक्षीदार होणार असून या 60 कोटी रुपयांची सर्व सविस्तर माहिती आपण लेखी स्वरुपात न्यायालयात सादर केली आहे, असे स्पष्टीकरण त्याने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.
सुकेश चंद्रशेखर याच्यावर 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच तामिळनाडूतील अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे ‘दोन पाने’ हे चिन्ह याच पक्षाच्या एका गटाला मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाला लाच देऊ केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. मंगळवारी दुपारी तो 200 कोटी रुपयाच्या घोटाळय़ाच्या प्रकरणात दिल्लीतील पतियाळा न्यायालयात उपस्थित झाला.
भाजपचा प्रतिप्रश्न
सुकेश चंद्रशेखर याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन आम आदमी पक्षाला 60 कोटी रुपयांची लाच दिल्याचा खुलासा केला आहे. त्याला राज्यसभेचे तिकिट देण्यासाठी या पैशांची मागणी करण्यात आली होती, असाही त्याचा दावा आहे. आता आम आदमी पक्षाने त्याची भूमिका स्पष्ट करावी. खरा ठग कोण आहे ? केजरीवाल की चंद्रशेखर, असा प्रतिप्रश्न भाजपच्या डिजिटल कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. या आरोपामुळे आम आदमी पक्षाची कोंडी झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तथापि, आम आदमी पक्षाने आरोप नाकारला आहे.
तीन सदस्यीय समिती
दिल्ली सरकारच्या गृहविभागाच्या मुख्य सचिवांनी सुकेश चंद्रशेखर याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. आम आदमी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना समिती चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर याने आम आदमी पक्षाचे नेते सत्येंदर जैन यांच्या विरोधातही आरोप केले आहेत. जैन सध्या मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणात तिहार कारागृहात आहेत. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.