दीडशतकी सलामीनंतरही न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला
@ कानपूर / वृत्तसंस्था
डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने (34-6-62-5) घरच्या मैदानावर आपला ‘गोल्डन रन’ कायम ठेवल्यानंतर भारताने येथील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या डावात 296 धावांवर रोखण्याचा पराक्रम साधला आणि डावाअखेर 49 धावांची आघाडी घेतली. शनिवारी तिसऱया दिवसअखेर भारताने दुसऱया डावात 1 बाद 14 धावा केल्या आणि एकूण आघाडी 63 वर नेली.
न्यूझीलंडने बिनबाद 129 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली, त्यावेळी ते 400 धावांचा टप्पा सहज सर करु शकतील, अशीच परिस्थिती होती. टॉम लॅथम (282 चेंडूत 95) व विल यंग (214 चेंडूत 89) या दोन्ही सलामीवीरांनी त्या थाटात आक्रमक सुरुवात देखील केली. मात्र, अनुभवी रविचंद्रन अश्विनने (3-82) विल यंगला बदली यष्टीरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले तर टॉम लॅथमचा अडथळा अक्षरने दूर सारला. यादरम्यान आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजापैकी एक असलेल्या कर्णधार केन विल्यम्सनने लॅथमसह आणखी 46 धावांची भर घातली. मात्र, उमेश यादवने (1-50) विल्यम्सनला (64 चेंडूत 18) बाद केले आणि त्यानंतर खेळाचा सारा नूर पालटण्यास फारसा वेळ लागला नाही.
हंगामात पाचव्यांदा 5 बळी
अक्षर पटेल घरच्या मैदानावर या हंगामात उत्तम बहरात राहिला आणि येथील लढतही त्याला अपवाद ठरली नाही. त्याने साडेतीन कसोटीतच 32 बळी नोंदवले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध डावात 5 बळी घेण्याची त्याची ही हंगामातील पाचवी वेळ होती. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यात त्याने 4 वेळा असा पराक्रम गाजवला. शनिवारी दिवसातील शेवटच्या सत्रात शुभमन गिलला (1) काईल जेमिसनने कारकिर्दीत दुसऱयांदा बाद केले. या कसोटीत आता चेंडू अपेक्षेपेक्षा बराच खाली राहत असल्याने न्यूझीलंडला दुसऱया डावात बरेच झगडावे लागले तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. त्यामुळे, किवीज संघाची सारी भिस्त कर्णधार विल्यम्सनवरच अवलंबून असेल, हे जवळपास निश्चित आहे.
न्यूझीलंडची फलंदाजी विल्यम्सनवर कशी अवलंबून आहे, याची शनिवारी प्रकर्षाने प्रचिती आली. उमेश यादवच्या अप्रतिम इन-कटरवर विल्यम्सन बाद झाला आणि त्यानंतर हा सामना भारताच्या बाजूने झुकला.
दोन्ही सलामीवीरांची शतके हुकली
विल यंग व टॉम लॅथम यांनी 151 धावांची दणकेबाज, अर्धशतकी भागीदारी साकारली असली तरी उभयतांपैकी एकालाही शतक साजरे करता आले नाही. भारताने दुसरा नवा चेंडू घेतला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पडत गेले. उमेश यादवने विल्यम्सनला पायचीत करत जोरदार धक्का दिला. त्यानंतर पुढील दोन सत्रात भारताने अवघ्या 99 धावातच 8 बळी घेतले.
अक्षरने सातत्याने लेग-मिडल आणि ऑफ मिडलच्या लाईनमध्ये मारा करत रॉस टेलर (11), हेन्री निकोल्स (2) व लॅथम यांना अवघ्या 13 धावांच्या अंतरात बाद केले. रॉस टेलरला बाद केले, तो अक्षरचा क्लासिकल चेंडू ठरला. किंचीत फ्लाईट दिलेल्या या चेंडूवर त्याने रॉस टेलरला पुढे येऊन खेळणे भाग पाडले आणि चेंडू बॅटची कड घेऊन बदली यष्टीरक्षक केएस भरतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. नियमित यष्टीरक्षक वृद्धिमान साहा मानेच्या दुखापतीने त्रस्त असल्याने केएस भरतने यष्टीरक्षण केले. रविंद्र जडेजाने (1-57) रचिनला (13) तंबूचा रस्ता दाखवला.
निकोल्सचा (2) स्वीप करण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि तो ही अक्षर पटेलचा आणखी एक सावज ठरला. खेळपट्टी मंदगती गोलंदाजीला पोषक ठरत असताना अक्षरने याचा लाभ घेत सेट झालेल्या लॅथमला देखील केएस भरतकरवी यष्टीचीत केले. या चेंडूपूर्वी मात्र लॅथमची एकाग्रता 47 षटकात किंचीतही भंगली नव्हती. अक्षरने नंतर टॉम ब्लंडेलचा (94 चेंडूत 13) ‘शूटर’ चेंडूवर त्रिफळा उडवला. नंतर अक्षरने साऊदीला तर अश्विनने जेमिसन व सॉमरव्हिलेला बाद करत न्यूझीलंडचा डाव 142.3 षटकात सर्वबाद 296 धावांवर गुंडाळला.
भारताची खराब सुरुवात
पहिल्या डावाअखेर 49 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या यजमान भारताला 5 षटकांच्या खेळात शुभमन गिलला गमवावे लागले. जेमिसनने (2 षटकात 1-8) बॅट-पॅडमधून चेंडू काढत त्याचा त्रिफळा उडवला. दिवसअखेर मयांक अगरवाल 13 चेंडूत 4 तर चेतेश्वर पुजारा 14 चेंडूत 2 चौकारांसह 9 धावांवर नाबाद राहिले.
धावफलक
भारत पहिला डाव- सर्वबाद 345
न्यूझीलंड पहिला डाव (बिनबाद 129 वरुन पुढे) ः टॉम लॅथम यष्टीचीत बदली खेळाडू (केएस भरत), गो. अक्षर 95 (282 चेंडूत 10 चौकार), विल यंग झे. बदली खेळाडू (केएस भरत), गो. अश्विन 89 (214 चेंडूत 15 चौकार), केन विल्यम्सन पायचीत गो. यादव 18 (64 चेंडूत 2 चौकार), रॉस टेलर झे. बदली खेळाडू (केएस भरत), गो. पटेल 11 (28 चेंडूत 1 चौकार), हेन्री निकोल्स पायचीत गो. पटेल 2 (9 चेंडू), टॉम ब्लंडेल त्रि. गो. पटेल 13 (94 चेंडू), रचिन रविंद्र त्रि. गो. जडेजा 13 (23 चेंडूत 2 चौकार), काईल जेमिसन झे. पटेल, गो. अश्विन 23 (75 चेंडूत 1 चौकार), टीम साऊदी त्रि. गो. पटेल 5 (13 चेंडूत 1 चौकार), विल्यम सॉमरव्हिले त्रि. गो. अश्विन 6 (52 चेंडू), अजाझ पटेल नाबाद 5 (6 चेंडूत 1 चौकार). अवांतर 16. एकूण 142.3 षटकात सर्वबाद 296.
गडी बाद होण्याचा क्रम
1-151 (विल यंग, 66.1), 2-197 (विल्यम्सन, 85.3), 3-214 (रॉस टेलर, 94.3), 4-218 (निकोल्स, 96.5), 5-227 (टॉम लॅथम, 102.1), 6-241 (रचिन, 110.4), 7-258 (ब्लंडेल, 123.4), 8-270 (साऊदी, 127.4), 9-284 (जेमिसन, 138.6), 10-296 (विल्यम सॉमरव्हिले, 142.3).
गोलंदाजी
इशांत शर्मा 15-5-35-0, उमेश यादव 18-3-50-1, रविचंद्रन अश्विन 42.3-10-82-3, रविंद्र जडेजा 33-10-57-1, अक्षर पटेल 34-6-62-5.
भारत दुसरा डाव ः मयांक अगरवाल खेळत आहे 4 (13 चेंडू), शुभमन गिल त्रि. गो. जेमिसन 1 (3 चेंडू), चेतेश्वर पुजारा नाबाद 9 (14 चेंडूत 2 चौकार). एकूण 5 षटकात 1 बाद 14.
गडी बाद होण्याचा क्रम
1-2 (शुभमन, 1.1).
गोलंदाजी
टीम साऊदी 2-1-2-0, काईल जेमिसन 2-0-8-1, अजाझ पटेल 1-0-4-0.
मैदानी पंचांची अश्विन-रहाणेशी ‘ती’ चर्चा कशासाठी?
किवीज कर्णधार केन विल्यम्सन फलंदाजी करत असताना रविचंद्रन अश्विनने राऊंड द विकेट मारा करण्यावर भर दिला. यातील दोन-एकदा फॉलोथ्रूमधील डेंजरस एरियात पावले टाकल्यामुळे पंच नितीन मेनन यांनी अश्विनला ताकीद दिली आणि यावरुन उभयतात बरीच चर्चा झडली. स्पाईक्सच्या माध्यमातून काही ‘रफ’ करण्याचा अश्विनचा प्रयत्न लपून राहण्याचे कारण नव्हते आणि यावरुन पंचांनी अश्विनला ताकीद दिली, तसेच रहाणेला देखील पाचारण केले. योगायोग म्हणजे, याच रफचा वापर करत अश्विनने शेवटच्या टप्प्यात जेमिसन व सॉमरव्हिले यांचे बळी घेतले.