डीसीजीआयच्या संमतीमुळे लसीकरणाला मिळणार गती ः लवकरच लसीकरण सुरू होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्स लसीला मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने कोवोव्हॅक्स लस विकसित केली आहे. याशिवाय जेनोव्हा बायोफार्मास्युटिकलच्या दोन डोसच्या ‘एमआरएनए’ लसीलाही मान्यता देण्यात आली आहे. सध्या ही लस केवळ 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लाभार्थींना दिली जाऊ शकते. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत विषयतज्ञ समितीने या लसीच्या तातडीच्या वापरासाठी प्रस्ताव दिला होता.
देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाटय़ाने वाढत आहेत. केरळ-महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, बंगाल, दिल्लीतही बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. याचदरम्यान, डीसीजीआयने 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्स लस मंजूर केल्याने मुलांसह पालकांनाही दिलासा मिळू शकतो. तथापि, या वयोगटातील मुलांचे लसीकरण केव्हापासून सुरू होणार, यासंबंधी अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता पुढील टप्प्यात देशात 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लवकरच कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेली कोवोव्हॅक्स लस लवकरच लहान मुलांनाही मिळणे सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनीने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. त्यानुसार सध्या तज्ञ समितीने 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मान्यता दिली आहे. आता त्याला ‘डीसीजीआय’कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.
24 तासांत देशात 21 टक्के रुग्णवाढ
मंगळवारी देशात 14,258 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. याचदरम्यान देशात 11,468 बाधित बरे झाले आणि 30 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू झाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी नवीन प्रकरणांमध्ये 21 टक्के वाढ झाली. सोमवारी 11,793 नवीन रुग्ण आढळले होते. ही रुग्णसंख्या रविवारच्या तुलनेत 32 टक्के कमी होती. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र आणि केरळ आघाडीवर आहेत. गेल्या 24 तासांत 47 टक्के नवीन रुग्णांसह महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचवेळी बंगालमधील नवीन प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसून आली.