हिरवी शेपटी असणाऱया लिओनार्ड नामक रहस्यमय धूमकेतूचे दर्शन पृथ्वीवासीयांना लवकरच घडणार आहे. 12 डिसेंबर या दिवशी अर्थात एक-दोन दिवसातच हा धूमकेतू पृथ्वीजवळून जाणार आहे. तो सर्वात चमकदार म्हणून ओळखला जातो. गेल्या 70 हजार वर्षांत प्रथमच हिरवी शेपटी असणारा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार असल्यामुळे अवकाश संशोधकांप्रमाणेच सर्वसामान्य माणसांचेही कुतूहल जागृत झाले आहे. पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर 3 कोटी 50 लाख किलोमीटर इतके असेल, असे संशोधकांकडून सांगण्यात आले आहे. हा धूमकेतू रात्रीच्या वेळी संपूर्ण एक महिनाभर दिसत राहील. दिवसेंदिवस त्याचा चमकदारपणा वाढत जाईल. उत्तर गोलार्धात तो ईशान्य आकाशात दुर्बिणीच्या साहाय्याने दिसू शकेल. या धूमकेतूचा शोध खगोलतज्ञ ग्रेगरी जे. लिओनार्ड यांनी लावला होता. त्यामुळे त्यांचेच नाव त्याला देण्यात आले आहे.
या धूमकेतूचे दर्शन घेण्याचा सर्वात चांगला समय 12 डिसेंबरला सूर्योदयापूर्वी काही तास अगोदरचा असेल. 14 डिसेंबरनंतर तो सूर्यास्तानंतर आकाशात दिसू शकेल. 17 डिसेंबरनंतर तो अधिक प्रखरपणे दिसू लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या धूमकेतूची आकर्षक हिरवी शेपटी देखील काही दिवस दिसू शकेल. जसजसा तो सूर्याच्या नजीक जाईल तसे त्याचे तापमान वाढल्याने तो विरळ होत जाईल. ज्यांना अवकाशस्थ ग्रहगोल पाहण्याची आवड आहे त्यांनी विशेष व्यवस्था केल्यास त्यांना तो दिसू शकेल, असे संशोधकांनी प्रतिपादन केले आहे.
त्याच्या हिरव्या शेपटीचे महत्त्व अधिक आहे. हिरव्या रंगाची शेपटी असणारे धूमकेतू इतर धूमकेतूंच्या मानाने अधिक तप्त असतात. त्यांच्यात सायनाईड आणि डायटोमिक कार्बनचे प्रमाण अधिक असते. पृथ्वीजवळ असे धूमकेतू तुटू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. तथापि त्यांचा पृथ्वीला धोका नसतो. कारण ते पृथ्वीपासून बऱयाच दूर अंतरावर असतात. 70 हजार वर्षांनंतर येणाऱया या धूमकेतूमुळे अवकाश संशोधकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.