ब्रिटनमध्ये लसीकरणाचा शुभारंभ : फायजर कंपनीकडून उपलब्ध
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमध्ये मंगळवारपासून कोरोनाच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. ब्रिटनमधील 90 वर्षीय मार्गारेट कीनन या फायजरची लस प्राप्त करणाऱया जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. मध्य इंग्लंडच्या लोक कोवेंट्री रुग्णालयात त्यांना ही लस देण्यात आली आहे.
कोरोनावरील लस घेणारी पहिली व्यक्ती ठरल्याने मला आनंद आहे. नव्या वर्षात निश्चिंत होऊन स्वतःच्या कुटुंबासमवेत वेळ घालविता येणार असल्याने अत्यंत आनंदी असल्याचे उद्गार कीनन यांनी लस टोचून घेतल्यावर काढले आहेत.
ब्रिटनमधील 70 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना फायजर आणि बायोएनटेक कंपनीची लस देण्यात येत आहे. भारतीय वंशाचे 87 वर्षीय हरि शुक्ला यांनाही पहिल्या टप्प्यात लस मिळणार आहे. त्यांना त्यांच्या 83 वर्षीय पत्नी रंजना शुक्ला यांच्यासोबत न्यू कॅसल रॉयल इंफर्मरीमध्ये लस देण्यात येणार आहे. शुक्ला यांचा जन्म युगांडात झाला होता आणि 1974 मध्ये ते ब्रिटनमध्ये पोहोचले होते. रेस रिलेशनसाठी काम केल्याबद्दल त्यांना ब्रिटनमध्ये ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरही प्राप्त झाला आहे. महामारी लवकरच संपण्याची अपेक्षा असल्याचे उद्गार शुक्ला यांनी काढले आहेत.
अनेक टप्प्यांमध्ये लसीकरण
सुमारे एक आठवडय़ापूर्वी फायजर-बायोएनटेक लसीला ब्रिटिश नियामकाने मंजुरी दिली होती. ब्रिटन या लसीचा वापर करणारा जगातील पहिला देश आहे. लसीकरण अनेक टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 80 पेक्षा अधिक वयाच्या लोकांना आणि काही आरोग्य कर्मचाऱयांना लस मिळणार आहे. इंग्लंडसह वेल्स आणि स्कॉटलंडमध्येही लसीकरण सुरू झाले आहे. लवकरच लसीकरण सुरू करणार असल्याचे उत्तर आयर्लंडने म्हटले आहे.
आजचा दिवस महत्त्वपूर्ण
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आगामी आठवडे आणि महिन्यांमध्ये आम्हाला कोरोनासंबंधी हिवाळय़ाच्या योजनेवर लक्ष द्यावे लागणार आहे. सर्व लोकांनी स्वतःच्या भागांमध्ये नियमांचे पालन करावे. हात, चेहरा आणि जागेच्या स्वच्छतेशी संबंधित बाबींचे कटाक्षाने पालन करा असे उद्गार पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काढले आहेत.
8 लाख डोससह लसीकरण सुरू
आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनीही लसीकरण सुरू झाल्याप्रकरणी आनंद व्यक्त केला आहे. काळोख्या भुयारात आम्हाला प्रकाश दिसून येतोय. भयावह आजारासोबतच्या लढाईत आजचा दिवस स्मरणीय ठरणार आहे. सरकार 8 लाख डोससह लसीकरण सुरू करत आहे. परंतु आम्ही 4 कोटी डोसचा ऑर्डर दिला आहे. हे प्रमाण देशाच्या 2 कोटी लोकांसाठी पुरेसे ठरणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जाणार आहेत. पहिल्या डोसच्या 21 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे हॅनकॉक म्हणाले.
लस साठवणुकीचे आव्हान
नॅशनल हेल्थ सर्व्हिससाठी सर्वात मोठे आव्हान या लसीची साठवणूक करणे हे आहे. साठवणुकीची स्थिती योग्यप्रकारे तपासण्यासाठी 50 रुग्णालयांची पूर्वीच निवड करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून लसीची खेप पोहोचत आहे. आतापर्यंत 8 लाख लसींची पहिली खेप बेल्जियममधून ब्रिटनमध्ये पोहोचली आहे. त्यांना उणे 70 अंश तापमानात ठेवले जात असल्याची माहिती एनएचएसचे सेवा प्रदाते प्रमुख सेफ्रीन कोर्डरी यांनी दिली आहे.
लस सुरक्षित
ब्रिटनमध्ये लसीकरणाला जलद मंजुरी मिळाल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली होती. परंतु सरकार आणि नियामकाने सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत. हे अत्यंत मोठे यश असून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. लवकर मंजुरी मिळाली हे आम्ही मान्य करतो, परंतु ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणात सामील लोकांवर नजर ठेवणार आहोत. त्यांना कार्ड दिले जाणार असल्याचे कोर्डरे यांनी सांगितले आहे.