मुलांच्या पाठबळामुळे कोरोनाविरुध्दची लढाई जिंकल्याची प्रतिक्रिया
वार्ताहर/ ताम्हाने
संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावच्या राबिया नेवरेकर या 92 वर्षाच्या आजीने कोरोनाविरुध्दची लढाई जिंकत कोरोना रुग्णांना आत्मवेश्वास देऊ केला आहे. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सिराज नेवरेकर यांच्या त्या आई आहेत.
कोरोनामुळे अनेकांच्या घरचे संबंध बिघडले, नाती तुटली, कोणी आई -वडिलांपासून लांब झाला तर कोणी भावापासून. मात्र सिराजभाई नेवरेकर व त्यांच्या भावंडानी कोरोनाच्या लढाईत आईची साथ सोडली नाही. आईचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्व मुलांनी आईला बळ दिले. आईला हॉस्पिटलमध्ये कंटाळा येऊ नये म्हणून गाणी व इतर उपक्रम राबवून त्या एकटय़ा असल्याचा भास त्यांना होऊ दिला नाही. 6 डिसेंबरला त्या पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीतील अपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ.सुशिल मुळ्य़े यांनी केलेल्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आजींनी कोरोनावर मात केली. आजी 92 व्या वर्षीही ठणठणीत आहेत. अतिशय गरीब परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांना संस्कार दिले. आज याच मुलांच्या मदतीने त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे ही लढाई जिंकल्याचे मत आजींनी या बाबत बोलताना व्यक्त केले. 92 व्या वर्षी कोरोनावर मात करून रबिया आजींना अनेकांना या आजाराविरुध्द लढण्याचे बळ दिल्याचे मानले जात आहे.
.