पेट्रोल वाटपावरून बाचाबाची : दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक, समोरासमोर भिडले : काही काळ तणाव
कार्यकर्त्याच्या टिकाटिपण्णीने वैभव नाईक आक्रमक
एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
भारत पेट्रोलियम पंपासमोरची घटना
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राडा टळला
वार्ताहर / कुडाळ:
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अल्पदरात पेट्रोल वाटपाच्यावेळी शनिवारी सकाळी कुडाळ येथील भारत पेट्रोलियम पंपासमोर शिवसेना व भाजप पदाधिकारी -कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन दोन्ही गट समोरासमोर भिडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.
भाजपच्या एका कार्यकर्त्याने वैयक्तिक टीकाटिप्पणी करताच आमदार वैभव नाईक आक्रमक होत त्याच्या दिशेने चाल करून गेले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांना ढकलून ते पुढे गेले. मात्र, त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी तेथून बाजूला केले. भारत पेट्रोलियम पंपासमोरच शिवसेनेचे पदाधिकारी पेट्रोल भरण्यासाठी पैशांचे पाकीट देत असल्याने वादाची ठिणगी पडली. स्थानिक पोलीस व जादा पोलीस कुमक असल्यानेच दोन्ही गटांना थोपविणे शक्मय झाल्याने राडा टळला.
दरम्यान, आमदार नाईक यांनी हायवे नजीकच्या लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला. तेथे हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित शनिवारी आमदार नाईक यांनी सर्वसामान्य वाहनधारकांना प्रत्येकी शंभर रुपयात दोन लिटर पेट्रोल व भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविणाऱयाला एक लिटर मोफत पेट्रोल येथील खरेदी-विक्री संघानजीकच्या भारत पेट्रोलियम पंपावर देण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते. पेट्रोल देण्याच्या या उपक्रमाबरोबरच शिवसेनेने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते सकाळी येथील शिवसेना कार्यालयात मोठय़ा संख्येने उपस्थित राहिले होते.
वैभव नाईक कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपाकडे रवाना
वाहनधारकांना पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी आमदार नाईक यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि. प सदस्य अमरसेन सावंत, विकास कुडाळकर, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, सचिन काळप, जीवन बांदेकर, युवासेनेचे योगेश धुरी व अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते येथील भारत पेट्रोलियम पंपासमोर गेले.
विरोध दर्शविण्यासाठी भाजप कार्यकर्ते उपस्थित
शिवसेनेने पेट्रोल वाटप उपक्रमासाठी राणे यांच्याशी संबंधित पेट्रोल पंप निवडल्याने भाजपचे युवानेते आनंद शिरवलकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, माजी सरपंच पप्या तवटे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, आबा धडाम, शहराध्यक्ष राकेश कांदे, ममता धुरी, चेतन धुरी, स्वरुप वाळके व अन्य कार्यकर्ते विरोध दर्शविण्यासाठी त्या पेट्रोल पंपाच्या आवारात उपस्थित राहिले होते.
..आणि ठिणगी पडली
पेट्रोल पंपासमोर रस्त्यानजीक पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांना शिवसेनेतर्फे पैशांचे पाकिट देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांना विचारणा करण्यासाठी पुढे सरसावले. शिरवलकर यांनी याबाबत विचारणा करताच दोन्ही पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
पोलिसांकडून दोन्ही गटांना थोपविण्याचा प्रयत्न
पोलीस त्यात हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना थोपविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘वैभव नाईक आगे बढो’, ‘नीतेश राणे आगे बढो’, ‘नीलेश राणे आगे बढो’, याचबरोबर परस्पर विरोधी निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. या वादामुळे वातावरण तंग बनले. भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, सुनील बांदेकर यांनीही भारत पेट्रोलियम पंपाकडे धाव घेतली.
..आणि वैभव नाईक कार्यकर्त्याच्या दिशेने चाल करून गेले
पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आमदार नाईक यांनी हायवे नजीकच्या लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पेट्रोल देण्याचा निर्णय घेऊन ते आपले शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह त्या दिशेने निघण्याच्या तयारीत होते. वादही काहीसा शांत होत असताना भाजपच्या एका कार्यकर्त्याने आमदार नाईक यांना उद्देशून शाब्दीक अवमान केला. तेव्हा नाईक आक्रमक बनले आणि त्या कार्यकर्त्याच्या दिशेने चाल करून गेले. पोलीस निरीक्षक कोरे व पोलीस कर्मचाऱयांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बाजूला ढकलत त्याच जोशात पुढे सरसावले. त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बाजूला केल्याने पुढील संघर्ष टळला.
वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पेट्रोल देण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत प्रत्येक वाहनधारकाला शिवसेनेतर्फे 110 रु. आणि वाहनधारकांचे स्वतःचे 100 रु. देऊन दोन लिटर पेट्रोल त्याला मिळाले. वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलिसांच्या सतर्कतेने राडा टळला
भारत पेट्रोलियम पंपाची शिवसेनेने केलेली निवड म्हणजे वादाला कारण ठरू शकते, या शक्मयतेने पोलीस यंत्रणा तयारीनिशी होती. त्या दृष्टीने कडक बंदोबस्ताचे नियोजन केले होते. कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड तसेच जिल्हा मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक मागविण्यात आले होते. या बंदोबस्तामुळे दोन्ही गटांवर नियंत्रण आणणे शक्मय झाले. अन्यथा दोन्ही गटात राडा झाला असता.
महागाई विरोधात यापुढेही आंदोलन – वैभव नाईक
शिवसेना ही चळवळीतील काम करणारी संघटना आहे. यापूर्वी साखर, कांदे, तेलांचे दर वाढल्यानंतर शिवसेनेने ते पदार्थ मोफत वाटप केले. दोन वर्षांपूर्वी 80- 90 रुपये पेट्रोल आता 104 रु. झाले. त्यामुळे सर्वसामान्य लोक व रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरुपात सर्वसामान्यांना एक लिटर पेट्रोल देत आहोत. हा पेट्रोल पंप कुणाचा, यात दुमत नव्हते. हा सरकारचा पंप आहे. पंप व्यावसायिक कोण, याबद्दल आमचा वादच नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे आलो. एक लिटर पेट्रोल देऊन मोदी सरकारच्या काळात ही महागाई झाली, हे दाखवायचे आहे. पंप मालकाची परवानगी लागते. आम्ही आत गेलो नाही. व्यवसाय कुणीही करावा. कोविड काळात आम्हाला वाद करायचा नाही. महागाईविरोधात यापुढेही आंदोलन सुरूच राहील. कोविडमुळे सर्वसामान्य लोक थांबले आहेत. या दरवाढीविरोधात त्यांचाही उदेक होईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.