– `मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ इंजेक्शन ठरतेय प्रभावी
कृष्णात चौगले/कोल्हापूर
`कासेरीव्हिमॅब’ आणि `इंडेव्हिमॅब’ या दोन औषधांपासून तयार करण्यात आलेले `मोनोक्लोनल अँटीबॉडिज कॉकटेल’ इंजेक्शन सध्या कोरोना रुग्णांसाठी प्रभावी औषध ठरले आहे. सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांना या इंजेक्शनच्या वापरानंतर अवघ्या 24 तासात कोरोनापासून मुक्ती मिळत आहे. त्यामुळे सध्या हे `कॉकटेल’ बाधितांसाठी वरदान ठरत आहे. डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये या इंजेक्शनचा वापर वाढला असून त्यामुळे कोरोनामुक्तांच्या संख्येतही वाढ होत आहे.
कोविड-19 रुग्णांचे लक्षणे नसलेले, सौम्य, मध्यम लक्षणे व गंभीर आणि अतिगंभीर लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये आढळणाऱया लक्षणानुसार वर्गीकरण करुन सविस्तर उपचार प्रणाली ठरविण्यासाठी शासनाच्या तज्ञ समितीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रोटोकॉल निश्चित केले आहेत. त्याचा डॉक्टरांना निश्चित फायदा होत आहे. त्यामध्ये रेमडेसिवीर, टॉसिलिझुमॅब, लिटोलिझुमॅब आणि पॅव्हिपीरावीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेतही याच औषधांचा वापर करून उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीबायोटीक आणि अँटीव्हायरलची मात्रा दिली जात असली तरी आजतागायत वैद्यकीय विश्वामध्ये फक्त कोरोनाचा संसर्ग रोखणारे प्रभावी औषध उपलब्ध झालेले नाही. जागतिक पातळीवर अद्यापही त्याबाबत प्रयोग सुरु आहेत. पण `कासेरीव्हिमॅब’ आणि `इंडेव्हिमॅब’ या दोन `मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल’ औषधामुळे कमी लक्षणे असणारा कोरोनाबाधित रुग्ण 24 तासात संसर्गमुक्त होत आहे.
संसर्गानंतर पहिल्या तीन ते सात दिवसात कॉकटेल ठरतेय प्रभावी
कोरोना संसर्ग झाल्यानंतर पहिल्या तीन ते सात दिवसात म्हणजेच पहिल्या टप्प्यात हे इंजेक्शन प्रभावी ठरते. ज्या रुग्णांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, त्या रुग्णासाठी या इंजेक्शनचा उपयोग नाही. भारतात सुरुवातीस हैदराबाद येथील डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी `एशियन इन्स्टिटÎूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’ या संस्थेमध्ये यशस्वी प्रयोग केला. 40 रुग्णांवर इंजेक्शनच्या वापरानंतर ते रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले. डॉ. संदीप पाटील यांच्या माहितीनुसार जगात सुरुवातीस अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे इंजेक्शन वापरले होते. त्यानंतर ब्रिटन, ब्राझिल, दक्षिण अफ्रिका येथे याचा मोठÎा प्रमाणात वापर करण्यात आला. डॉ. रेड्डी यांच्या यशस्वी प्रयोगानंतर भारतातही कॉकटेल इंजेक्शनचा वापर मोठÎा प्रमाणात वाढला आहे. सध्या सीप्ला कंपनीने हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध केले आहे.
एक इंजेक्शनची किंमत 1 लाख 20 हजार
`मोनोक्लोनल अँटीबॉडिज कॉकटेल’ इंजेक्शनची किंमत 1 लाख 20 हजार असून एक इंजेक्शन दोन रुग्णांसाठी वापरले जाते. इंजेक्शनच्या केवळ एक डोसमध्ये रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. कॉकटेलमध्ये `कासेरीव्हिमॅब’ आणि `इंडेव्हिमॅब’ ही दोन प्रकारची इंजेक्शन्स प्रत्येकी 11 मिलीची आहेत. त्यामुळे एका रुग्णासाठी प्रत्येक इंजेक्शनमधील 5.5 मिलीची मात्रा सलाईनमधून दिली जाते. एक इंजेक्शन दोन रुग्णांना पुरेसे ठरत असून ते अँटीबॉडीज असल्यामुळे रेमडेसिवीर अथवा इतर ऍन्टीव्हायरल औषधांप्रमाणे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत. कोल्हापुरातील औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन उपलब्ध असून त्याच्या विक्रीवरती शासन अथवा प्रशासनाकडून कोणतेही नियंत्रण नाही. हे इंजेक्शन महाग असले तरी ते सहजपणे उपलब्ध होत आहे.
कोल्हापुरात आठ दिवसात `कॉकटेल’चा वापर वाढला
सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांसाठी कॉकटेल इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी बार्शी येथील एक डॉक्टरांकडून `गेमचेंजर’ या नावाने हे औषध वापरले जात आहे. याच्या वापरानंतर सौम्य लक्षणे असणारा रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त होतो. त्यामुळे इतर उपचारपद्धती सुरु असताना ज्या पद्धतीने रुग्णाला 10 ते 12 दिवस रुग्णालयात थांबावे लागते, तसे थांबण्याची गरज भासत नाही. ज्या रुग्णांवर 10 दिवस उपचार होतात, त्याचा वैद्यकीय खर्च साहजिकच एक ते दीड लाखांपर्यंत पोहोचतो. पण कॉकटेल इंजेक्शनचा वापर केल्यास इंजेक्शनचे साठ हजार आणि इतर औषधांचे दहा हजार असे 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च होतो. तसेच रुग्ण 24 तासात घरी जाऊ शकतो. त्यामुळे त्याला रुग्णालयातील मानसिक आणि संसर्ग वाढल्यास होणारा शारीरिक त्रास होत नाही. –डॉ.संदीप पाटील, सिद्धिविनायक नर्सिंग होम, टाकाळा, कोल्हापूर