ऑनलाईन टीम / नागपूर :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला. त्यानंतर मुंबईतील वरळी परिसरातील घरावरही ईडीच्या दुसऱ्या टीमने छापा टाकला असून, दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंगअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासाचा भाग म्हणून ईडीने आज सकाळी 6 वाजता देशमुखांच्या घरी दुसऱ्यांदा छापा टाकला. यापूर्वी ईडीने 25 मे रोजीही देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानीही ईडीच्या दुसऱ्या टीमने छापा टाकला असून, झाडाझडती सुरू आहे.