प्रतिनिधी / मिरज :
मिरज पंचायत समितीचे सदस्य किरण बंडगर यांनी शुक्रवारी मासिक सभेत ओबीसी आरक्षणासाठी तसा पेहराव करुन शासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या या कृतीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत बाजू मांडली गेली नाही. त्यामुळे आरक्षण रद्द होण्याची नामुष्की आली आहे, असा आरोप बंडगर यांनी यावेळी केला.
राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणूका घेतल्या जावू नयेत. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बंडगर यांच्या या मागणीचे सभेसाठी उपस्थित सदस्यांनी समर्थन करीत ओबीसी घटकांना पुन्हा आरक्षण द्यावे, तोपर्यंत कोणत्याही निवडणूका घेतल्या जावू नयेत, असा ठराव केला.