मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. शुक्रवारी अनिल देशमुखच्या मुंबई आणि नागपूर इथल्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. यांनतर देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात अली आहे. दरम्यान या चौकशीदरम्यान ईडीने असा आरोप केला आहे की, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली. ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले. त्यानंतर ह्या पैश्यातला एक वाटा दिल्लीतल्या चार शेल कंपन्यांच्या माध्यमातून नागपूरातल्या एका चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवण्यात आला.
दरम्यान, देशमुख यांनी मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये त्यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले. संस्थेत देणगी स्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली गेली, असे ईडीने म्हंटले आहे. तसेच ईडीने शनिवारी नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा विशेष न्यायालयात केला. या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले. दरम्यान ईडीने देशमुखांना समन्स बजावला आहे. शनिवारी देशमुखाना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. आता आता पुन्हा ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.