ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा फोटोंच्या माध्यमातून त्यांचे हे श्वानप्रेम सर्वांसमोर आले आहे. राज यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातींचे सहा पाळीव श्वान आहेत. राज ठाकरेंच्या या पाळीव श्वानांपैकी एका श्वानाचे निधन झाले आहे. राज ठाकरेंच्या ‘जेम्स’ या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झाले आहे.
काल रात्री 12 च्या सुमारास ‘जेम्स’ या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झाले. वयोमानानुसार जेम्सचे काल निधन झाले. गेले अनेक वर्ष जेम्स हा राज ठाकरेंच्या कुटुंबाचा एक सदस्य होता. जेम्सच्या निधनानंतर स्वतः राज ठाकरे व अमित ठाकरे हे स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जेम्सचे अखेरचे दर्शन घेताना राज ठाकरे भावूक झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडे ग्रेट डेन या जातीचे तीन श्वान होते. त्यातील बॉण्ड या श्वानाचे याआधी 26 डिसेंबर 2018 रोजी निधन झाले होते. बॉण्ड 12 वर्षांपासून राज ठाकरेंसोबत होता. काही वर्षांपूर्वी बॉण्डनेच राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंवर हल्ला केला होता. त्यानंतर त्याची रवानगी कर्जतच्या फार्महाऊसवर करण्यात आली होती.
तर राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याकडे देखील मुफासा आणि ब्ल्यू नावाचे दोन श्वान आहेत.