वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने पुन्हा पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे.
इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 38 वर्षीय मिताली राजने 72 धावांची खेळी केली पण तिला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. 22 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये मिताली राजने यापूर्वी अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2017 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीत मजल मारणाऱया भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजने केले होते. आयसीसी महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत मिताली राजने पाचवे स्थान मिळविले आहे. 2019 च्या ऑक्टोबरनंतर मिताली राजचे मानांकनातील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये पुनरागमन झाले आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची सलामीची फलंदाज ब्युमाँट 719 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्किव्हरने आठवे स्थान मिळविले आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडच्या श्रबसोलने आठवे स्थान मिळविले आहे.