नवी दिल्ली/प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची आज बैठक बोलावली आहे. ही बैठक पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी होणार आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक दिवसापासून चर्चा सुरु असलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात केला जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे, मात्र याबाबत अजून कुणीही वाच्यता केलेली नाही.
या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून, याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नावे चर्चेत आहेत. यामध्ये नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.