मुणगे/ प्रतिनिधी-
मुणगे येथील भगवती हायस्कूल तिठा येथे मोटारसायकलने दिशादर्शक फलकास जोरदार धडक बसून मोटारसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडला. मुणगेतील तरूण ललित चंद्रकांत परब (३०वर्षे) आचरा मार्गावरुन येत असताना भगवती हायस्कूल तिठा येथील दिशादर्शक फलकास जोरदार धडक दिल्यामुळे दिशादर्शक फलक कोसळून पडला.
त्या जोरदार धडकेमुळे तरूणाच्या डोक्याला जबरदस्त मार बसून गंभीर जखम झाली. जखमेतून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुध्द अवस्थेतच त्याला डॉक्टरी उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. येथील प्रकाश परब यांचा तो पुतण्या होत. गतवर्षी लॉकडाऊन नंतर तो गावी आला होता. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करत आहेत. त्याच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.