अनलॉकमुळे बसपासच्या मागणीत वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱया सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक बचत व्हावी, याकरिता परिवहन मंडळातर्फे नोकरदारवर्गाला सर्व्हिस बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे दीड महिन्याहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प होती. त्यामुळे सर्क्हिस बसपासची कामे थांबली होती. मात्र आता सर्व प्रकारच्या बसेस विविध मार्गावर धावत असल्याने सर्व्हिस बसपासही उपलब्ध करून दिला जात आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून गोवा, कोल्हापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुबळी, धारवाड, बैलहोंगल आदी ठिकाणी दैनंदिन प्रवास करणाऱया कामगार-नोकरदारवर्गाची संख्या अधिक आहे. यांचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा, याकरिता परिवहनतर्फे सवलतीच्या दरात सर्व्हिस बसपास दिला जातो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान अनेक उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे सर्व्हिस बसपासच्या मागणीतही घट झाली होती. मात्र आता विविध मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. शिवाय अनलॉकमुळे अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया कामगार व नोकरदारवर्गाची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्व्हिस बसपाससाठी मागणी वाढत आहे.