मुंबई/प्रतिनिधी
देशात इंधन दरवाढीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होत आहेत. विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसने राज्यभरात महागाईविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान भाजपाचे नेते पेट्रोलवर दरवाढसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवार पुण्यात बोलतांना केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे हास्यास्पद विधान असल्याचे रोहीत पवार म्हणाले. तसेच रहित पवारांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.
दरम्यान, “खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,” अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावर रोहीत पवार यांनी खोटं काय आणि वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात.
विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.