स्थानिक व्यवसायावर आधारित शिक्षण देणार
तळेरेतील कार्यक्रमात कुलगुरू डॉ. पेडणेकर यांची माहिती
वार्ताहर / तळेरे:
येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात ‘प्रुट-फुल वे टू बायोडायर्व्हसिटी हॉटस्पॉट 20-21’ या कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले. दळवी महाविद्यालयाचा हा उपक्रम अनेक उपक्रमांसारखा चांगला आहे. निसर्गाचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे. या उपक्रमाने पर्यावरणाचे रक्षण होईल. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार असून त्या ठिकाणी स्थानिक व्यवसायावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी श्रीपाद वेलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिकांना उद्योजक होण्यासाठीची संधी प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पेडणेकर यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कर्नल नरेश कुमार (कमांडिंग ऑफिसर, 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी), मुंबई विद्यापीठाचे सिनेट मेंबर धनेश सावंत, एसपीके कॉलेज सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, मुंबई विद्यापीठाचे अभियंता विनोद पाटील, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे संचालक श्रीपाद वेलिंग आदी उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 2019 मध्ये तळेरे गावच्या सरपंच साक्षी सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गेल्यावर्षी माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर यावर्षी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या उपक्रमाची व्याप्ती या वर्षापासून वाढणार आहे. मुंबई विद्यापीठाचे एनएसएस विभागप्रमुख प्रा. सुधीर पुराणिक हा उपक्रम पुढे घेवून जाणार असून एनएसएस विभागाद्वारे संपूर्ण महामार्गावर तो राबविला जाईल, असे पेडणेकर म्हणाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काम सुरू असताना बरीच झाडे तोडली गेली. नवीन झाडांचे संवर्धन, आवश्यक असल्याचे सिनेट सदस्य धनेश सावंत म्हणाले. साक्षी भोगटे हिने महाविद्यालय विकास गाथा पीपीटीद्वारे दाखवली. अर्चना हिवाळकर हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. सायली महाजन हिने कर्नल नरेश कुमार यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन नरेश शेटये यांनी तर आभार हेमंत महाडीक यांनी मानले. एनसीसी विभागप्रमुख चेतन नेमण, डीएलएलई विभागप्रमुख नितीश गुरव व शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.