मुंबई \ ऑनलाईन टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र अससेल्या सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणी भाष्य केले आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी पेगॅससची चिंता सोडून पेंग्विनची चिंता करावी असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “संजय राऊतजी पेगॅससची चिंता सोडा पेंग्विनची चिंता करा, आज ज्या युवराजांच्या प्रिय ठेकेदारामुळं’डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला का आणि कोणासाठी?” असा सवालही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना केला आहे.
पेगॅसस’ प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.