रामनगर जिल्हय़ातील घटना : दिग्दर्शकासह दोघांना अटक
प्रतिनिधी /बेंगळूर
‘लव्ह यु रचू’ या कन्नड चित्रपटातील साहस दृश्यचे चित्रिकरण सुरू असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने साहाय्यक कलाकाराचा मृत्यू झाला. विवेक (वय 28) असे त्याचे नाव आहे. तर या घटनेत रणजित नामक आणखी एक कलाकार गंभीर जखमी झाला आहे. रामनगर जिल्हय़ाच्या बिडदी तालुक्यातील जोगीनदोड्डा येथे सोमवारी हि दुर्घटना घडली. या प्रकरणी दिग्दर्शक आर. शंकर आणि फाईट मास्टर विनोद यांना अटक करण्यात आली आहे.
अभिनेता अजय राव आणि रचिता राम यांची मुख्य भूमिका असणार्या ‘लव्ह यु रचू’ या चित्रपटाचे जोगीनदोड्डा येथे चित्रिकरण सुरू होते. क्रेनचा वापर करण्याचे दृश्य चित्रित करण्यात येत असताना क्रेनचा विद्युत तारेला स्पर्श झाला. या घटनेत मुळचा तामिळनाडू येथील विवेक आणि रणजित जखमी झाले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने विवेकचा मृत्यू झाला. तर जखमी रणजितवर आर. आर. इस्पितळात आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. सदर चित्रपटाचे निर्माते गुरु देशपांडे आहेत. साहसदृश्य दिग्दर्शक विनोद यांच्या देखरेखीखाली चित्रिकरण सुरू असताना हि दुर्घटना घडल्याने चित्रपटसृष्टीतन हळहळ व्यक्त होत आहे.