ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय लष्कराने स्वातंत्र्यदिनापूर्वीच नियंत्रण रेषेवर गॅटलिंग अँटी ड्रोन गन तैनात केल्या आहेत. ही गन दहशतवादी संघटनांचे ड्रोन दिसताच अचूक मारा करून ड्रोन नष्ट करेल. लष्कराने तयार केलेली ही विशेष बंदूक एकाच वेळी ड्रोनवर ट्रेस बुलेटने गोळीबार करेल. अखनूरच्या पलनवाला सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील अनेक ठिकाणी ही गन तैनात करण्यात आली आहे. सीमेपलीकडून दहशतवादी संघटनांच्या ड्रोनची घुसखोरी रोखण्यासाठी ही गन तयार करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनमधून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे. दहशतवाद्यांनी जम्मूतील हवाई दल स्थानकावरही ड्रोनद्वारे हल्ला केला होता. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत. ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्करानेच तीन इंसास रायफल एकत्र जोडून विशेष बंदूक तयार केली आहे. ही बंदूक हवेत 800 मीटर उंच तर समोरून 400 मीटर लांब मारा करेल.