सरकारी वाहिनीच्या महिला अँकरला हटविले, गव्हर्नर सलीमा मजारीला घेतले ताब्यात
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तालिबानची हुकुमशाही स्पष्ट दिसू लागली आहे. तालिबानने मंगळवारी पत्रकार परिषद घेत महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण अफगाणिस्तानच्या सरकारी वाहिनीच्या महिला अँकर खदीजा अमीन यांना आता हटविण्यात आले आहे. तर बल्ख प्रांताच्या महिला गव्हर्नर सलीमा मजारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सरकारी वाहिनीवर महिला काम करू शकत नसल्याचे अधिकाऱयांनी खदीजाला कळविले आहे. आता मी काय करणार, भविष्यातील पिढीसाठी काहीच नसेल. 20 वर्षांमध्ये जे आम्ही प्राप्त केले, ते सर्वकाही हातून जाईल. तालिबान हा तालिबानच राहिल, त्याच्यात काहीच बदल झाला नसल्याचे खदीजाने म्हटले आहे.
तालिबानशी केला मुकाबला
अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांताच्या गव्हर्नर सलीमा मजारी यांनी तालिबानच्या विरोधात शस्त्र हाती घेतले होते. अफगाणिस्तानचे नेतृत्व पलायन करत असताना सलीमा स्वतःच्या चारकिंट जिल्हय़ात लढत राहिल्या. स्वतःच्या जनतेच्या रक्षणासाठी त्यांनी तालिबानचा प्रतिकार केला. या जिल्हय़ाने अखेरपर्यंत तालिबानसमोर शरणागती पत्करली नव्हती. सलीमा यांनी मागील वर्षी चर्चेच्या माध्यमातून 100 दहशतवाद्यांना शरणागती पत्करायला लावली होती.