प्रतिनिधी/ रत्नागिरी
राखी पौर्णिमा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. विदेशात राखी पाठवण्यासाठी डाक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जगातील 106 देशात रजिस्टर व स्पीड पोस्टाने राखी पाठवता येणार आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्टेलिया, भूतान, श्रीलंका, मलेशिया, दुबईसह अन्य देशात राखी पाठवता येणार आहे. पण स्पीड पोस्टाने अमेरिकेत राखी पाठवण्यासाठी 250 ग्रॅम वजनाला 1550 तर दुबईमध्ये 1300 रुपये खर्च येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सण-समारंभाना अनेकांना मुरड घालावी लागली. पण 3 दिवसांवर येवून ठेपलेल्या भावा-बहिणीच्या पवित्र रक्षाबंधनाला परदेशात असलेल्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाने दरवर्षीप्रमाणे योजना ठेवली आहे. परदेशात भावाला राखी पाठवणं शक्य आहे, पण त्यासाठी थोडे जास्त पैसे बहिणींना मोजावे लागणार आहेत. स्पीड पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी परदेशात असलेला भाऊ हातावर बांधणार आहे.
106 देशात पाठवता येणार राखी
अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया ते दुबई अशा 106 देशात बहीण आपल्या भावाला राखी पाठवू शकते. स्पीड पोस्टाने थोड महाग तर साध्या पत्राने अगदी कमी दरात ही राखी परदेशातल्या भावाला पाठवण्यासाठी पोस्टामार्फत खास व्यवस्था करण्यात आली आहे. राख्या वेळेवर पोहोचवण्यासाठी डाक विभागाकडून नियोजन केले गेले आहे. राखी असलेली पाकिटे तिकिटे लावून पाठवावी लागणार आहेत. पाकिटाच्या किंमतीसह राखीच्या वजनानुसार शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात आले.