सेन्सेक्स 55,555 वर बंद – एचसीएल टेक सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक संकेताच्या जोरावर आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी दमदार तेजीसह बंद होण्यात यश मिळविले आहे.
सोमवारी सरतेशेवटी भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 226.47 अंकांच्या वाढीसह 55,555.79 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 45.95 अंकांच्या तेजीसह 16,496.45 अंकांवर बंद झाल्याचे पहायला मिळाले. बाजारात काहीअंशी नफावसुलीही दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीसह तर निफ्टीतील 50 पैकी 28 समभागांमध्ये विक्री दिसून आली. तर निफ्टी बँक निर्देशांकात 12 पैकी 6 समभाग तेजीत होते.
निफ्टी निर्देशांकामध्ये एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक 4 टक्क्यांनी वाढलेले दिसले. तर या पाठोपाठ नेस्ले इंडिया आणि टीसीएस यांचे समभाग 2 टक्क्यांनी वाढले होते. या व्यतिरीक्त बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी यांचे समभागही तेजीत होते. दुसरीकडे ग्रेसिम इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच बजाज ऑटो यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले. बीएसईमधील भारती एअरटेल, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, एचयुएल, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज ऑटो यांचे समभाग 2 टक्के नुकसानीत होते. या सोबत अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एशियन पेंट्स, टाटा स्टील यांचे समभागही 1 टक्क्यांनी घसरणीत राहिल्याचे दिसून आले.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजार तेजीसह खुला झाला. मात्र त्यानंतरच्या दिवसभराच्या कालावधीत चढउतार दिसून आला. जागतिक बाजारातील मजबुत कामगिरी याच्या जोरावर भारतीय बाजाराने तेजीकडे कल दर्शविला. इतर आशियाई बाजारामध्ये शांघाई, हाँगकाँग, टोकियो आणि सेऊल बाजार तेजीसह बंद झाले. तर दुपारच्या सत्रामध्ये युरोपिय बाजारही तेजीसह व्यवहार करत होते.