उत्तरप्रदेशातील आग्रा येथील एक महिला कॉन्स्टेबल सध्या इन्स्टाग्रामवर कमालीची लोकप्रिय झाली आहे. प्रियांका मिश्रा असे तिचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आणि त्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या फॉलोअर्समध्ये दिवसाला दुप्पट या गतीने वाढ होत आहे. त्यामुळे तिने स्वतःचे आणखी काही व्हिडिओज अपलोड केले आहेत.
प्रियांका मिश्रा या 2020 मध्ये कॉन्स्टेबल झाल्या आहेत. त्यांना स्वतःच स्वतःचे व्हिडिओ बनविण्याचा छंद आहे. एप्रिलपासून 25 ऑगस्टपर्यंत त्यांनी असे 76 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यातील काही अत्यंत विनोदी आहेत. मात्र, एका पोलीस कॉन्स्टेबलने अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणे नियमात कसे बसते, हा आक्षेपाचा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस खात्याने यात लक्ष घालून त्यांना काही व्हिडिओ डिलिट करावयास लावले आहेत. तरीही त्यांची क्रेझ कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यांच्या व्हिडिओपैकी काही आक्षेपार्ह असल्याची टीका अनेकांनी केली आहे. आता उत्तर प्रदेशचा पोलीस विभाग यासंबंधी काय करणार? याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.