निवडणूक लढविण्यावर ठाम, शिवाजी सुंठकर यांची पक्षातून हकालपट्टी
बेळगाव / प्रतिनिधी
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या पत्नी सुलोचना सुंठकर या बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्र. 47 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. मात्र माघार घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पक्षाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दबावाला दाद न देता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे भाजपमधून हकालपट्टी करण्याचा इशारा माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना देण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यात येत आहे. पण राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांच्या पाठिशी कोणीच नसल्याने पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दाम, दंड, भेद वापरण्यास सुरू करण्यात आला आहे. कणबर्गी परिसरात येणाऱया वॉर्ड क्र. 47 मधून सुलोचना सुंठकर या अपक्ष म्हणुन निवडणूक लढवित आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणातून माघार घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असा दबाव भाजपाच्या वरिष्ट पदाधिकाऱयांनी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यावर घातला. तर आम्ही आमच्या मतदारांच्या मर्जीनुसार निवडणूक लढवित आहोत. त्यामुळे माघार घेणार नाही अशी भुमिका सुंठकर यांनी स्पष्ट केली. त्यामुळे पक्षातून काढण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. तसेच पक्षातून काढण्याची कारवाई करण्यात आली.