@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये देशाभरात 31,222 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत बरे होणाऱयांची संख्या 42,942 इतकी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या याच कालावधीत 290 राहिलेली असून ती गेल्या पंधरा दिवसांमधील सर्वात कमी आहे. दोन दिवस उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरीही तिसऱया उद्रेकाचा धोका असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या एकंदर 3,92,864 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये पॉझिटिव्हीटी दर 2.05 टक्के तर बरे होण्याचा दर 97.48 टक्के इतका आहे. गेले 74 दिवस सातत्याने पॉझिटिव्हीटी दर अडीच टक्क्यांच्या खाली राहिलेला आहे. आतापर्यंतच्या एकंदर रुग्णसंख्येमध्ये उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.19 टक्के इतके आहे. आजपर्यंत 69.90 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आलेला आहे. तर एकूण लोकसंख्येच्यग्ना 12 टक्के लोकांना दोन डोस देण्यात आले असून त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे, अशी माहिती देण्यात आली. केरळमध्येही मंगळवारी रुग्णसंख्या काहीशी घटलेली आहे. मात्र मुंबईत ती पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तेथे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.