मँचेस्टर : पुढील महिन्यात ओमान आणि संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरूवारी इंग्लंडच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आली असून 30 वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.
आयसीसीची ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी स्टोक्सने क्रिकेटपासून काही काळ अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 साली झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱया इंग्लंड संघामध्ये त्याचा समावेश होता. त्याचप्रमाणे इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत तो डरहॅम संघाकडून खेळत होता. दरम्यान, त्याने या स्पर्धेसाठी आपण उपलब्ध राहू शकणार नाही, असे कळविले आहे. गेल्या जुलैपासून त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. स्टोक्सने क्रिकेटपासून काही काळ अलिप्त राहण्याचा निर्णय कळविल्याने इंग्लंडच्या निवड समितीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला संघात स्थान दिले आहे. 2017 नंतर मिल्सचे इंग्लंड संघात पुनरागमन होत आहे. ओमानमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व मॉर्गनकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा संघ चार सरावाचे सामने खेळणार असून त्यामध्ये पाक संघाविरुद्धच्या दोन सामन्यांचा समावेश आहे.
इंग्लंड संघ- मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टो, बिलिंग्ज, बटलर, सॅम करण, ख्रिस जॉर्डन, लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, मिल्स, आदिल रशीद, रॉय, विली, वोक्स, मार्क वूड, राखीव- टॉम करण, डॉसन, जेम्स व्हिन्स.