हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच विद्युत बिलाची रक्कम अदा केली नसल्याने हेस्कॉमकडून पथदिपांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरात अंधार पसरला आहे. परिणामी कॅम्प परिसरातून ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडथळय़ांचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच विद्युतबिल व पाणीपट्टी भरण्यासाठी निधी नसल्याने सहा कोटीच्या घरात रक्कम थकली आहे. अडीच कोटीहून अधिक विद्युतबिलाची रक्कम असल्याने हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कॅम्पमधील विविध रस्त्यांसह किल्ला परिसरातील पथदीप बंद पडले आहेत. परिणामी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
विविध रस्त्यांची दुरवस्था
कॅम्प परिसरातील स्वतंत्रता मार्ग आणि आसदखान दर्गा परिसरातील रस्त्यासह विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठीही कॅन्टोन्मेंटकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळय़ात खड्डय़ांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. पावसाचे पाणी खड्डय़ांमध्ये साचून राहत असल्याने खड्डय़ांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. अशातच पथदीप बंद असल्याने अंधारातून जाणाऱया वाहनांचे अपघात होत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारक घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा विविध समस्यांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.
किल्ला आणि कॅम्प परिसरातील पथदीप बंद असल्याने अंधार पसरला आहे. किल्ला परिसरात झाडेझुडुपे अधिक असल्याने रात्रीच्यावेळी खूपच भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱया नागरिकांना भीतीच्या छायेखाली ये-जा करावी लागत आहे.
तसेच या परिसरात सापाकिडय़ांचे वास्तव्य असल्याने रहिवाशांनाही धोका निर्माण झाला आहे. अंधारामुळे रहिवाशांना रात्रीच्यावेळी बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. येथील पथदीप सुरू करण्यात यावेत व कॅम्प परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.