प्रतिनिधी / कडेगाव
कडेपूर (ता.कडेगाव) येथील सर्पमित्र दादासो तुकाराम पोळ (वय-56) व हर्षल दादासो पोळ (21,दोघे रा. कडेपूर) यांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार करुन मांस खाल्ल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वन विभागात गुन्हा दाखल झाला असून संशयित दादासो व हर्षल यांना अटक करण्यात आले. दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडेपूर यादव मळा येथील वैभव कदम यांचे घरी शनिवारी (ता.18) वन्यप्राणी घोरपड आढळून आली. सदर घोरपड पकडण्यासाठी वैभव यांनी गावातील सर्पमित्र दादासो पोळ याला दूरध्वनीवरुन बोलावले. यावेळी दादासो पोळ याने वैभव यांचे घरी जावून वन्यप्राणी घोरपडीस ताब्यात घेवून अवैधरीत्या मोटारसायकलवरुन गेला. याबाबत वन विभागाला माहिती मिळाली होती. त्यामुळे सहायक वन संरक्षक डॉ.अजित साजने, कडेगाव-पलूसच्या वन परीक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण,वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्या पथकाने तात्काळ वैभव कदम यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी वन्यप्राणी घोरपड दादासो पोळ याने त्याच्या शेताकडे घेवून गेल्याचे सांगितले.
वन विभागाच्या या पथकाने दादासो पोळ याच्या कडेपूर-विटा रस्त्यावरील शेतामध्ये जावून तपासणी केली असता.त्यांना शेतीमधील गोठ्याजवळ वन्यप्राणी घोरपडीचे काही अवयव व मांस जळालेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी तेथे असलेल्या हर्षल पोळ यांच्याकडे वन विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली. तर घटनास्थळी आढळून आलेले वन्यप्राणी घोरपडीचे अवयव व मांस पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्यातील काही नमुने उत्तरीय तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले. तर संशयित आरोपी दादासो पोळ व हर्षल पोळ याचे विरुद्ध ठोस पुरावे प्राप्त झालेमुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम कायद्याप्रमाणे दादासो व हर्षल पोळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
या प्रकरणी अधिक तपास उपवनसंरक्षक (सांगली) विजय माने, सहायक वन संरक्षक डॉ.अजित साजने यांचे मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, वनपाल साळोखे, ठोंबरे, वनरक्षक भाग्यश्री कुंभार, अभिजित कुंभार, अनिल कुंभार, सुनील पवार हे करीत आहेत.