प्रतिनिधी/कोल्हापूर
ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या आशियाई 18 व्या वर्षाखालील मुलींच्या सेव्हन-ए-साईड रग्बी स्पर्धेमध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. अतिशय चुरशी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अंतिम गुणफलक संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाने भारतीय संघाचा 21-17 ट्राय फरकाने पराभूत पेले. स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाले असले तरी संघाची संपूर्ण आशिया खंडात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. यात कोल्हापूरची वैष्णवी पाटीलने शानदार खेळी करत भारतीय संघाला सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने साखळी सामन्यांसह 6 सामने खेळले. यापैकी साखळीतील पहिल्या सामन्यात कझाकिस्तान संघाकडून भारतीय संघाला 12-10 ट्राय फरकाने पराभूत स्वीकारावा लागला. दुसराही सामना जर भारतीय संघाने गमावला असता तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. पण जिद्दीला पेटलेल्या भारतीय संघाने किरगीस्तान संघाला 63 विरुद्ध 0 ट्रायने जिंकून स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. तसेच तिसरा सामना यजमान उझबेकिस्तानसोबत झाला. यात उझबेकिस्तानला भारतीय संघाने 5-20 ट्रायफरकाने पराभूत केले. चौथ्या सामन्यात मात्र युएई संघाकडून भारतीय संघाला 29-12 टायफरकाने हरवले. त्यामुळे भारतीय संघ आपल्या गटामध्ये चौथ्या स्थानावर राहिला. त्यामुळे भारतीय संघाची गाठ बलाढÎ कझाकिस्तान संघासोबत उपांत्य सामन्याच्या निमित्ताने पडली. या सामन्यात भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणेच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत कझाकिस्तान संघाला 24-7 अशा ट्रायफरकाने नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
भारतीय संघातील खेळाडूंची नावे: अंशिका (कर्णधार), आरती कुमारी, वैष्णवी पाटील, सपना कुमारी, नंदिनी, गोमती, क्रिझेल, आकांक्षा कटकडे, मामा नाईक, निर्मल्या राऊत, चारुलता नाईक व निकिता ओरवन.
प्रशिक्षक-नास बोथा, लुडविच डेवेंटर.
संघ व्यवस्थापक-सुरोजित घोष.
फिजिओथेरपिस्ट-वाबीज भारूचा.
कोल्हापूरची वैष्णवी सर्व सामने खेळली
आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भुवनेश्वर (ओडीशा) भारतीय संघ निवड चाचणी व सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूरची वैष्णवी पाटील (रा. पाडळी खर्द, ता. करवीर) ही रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे सहभागी झाली होती. महिनाभर चाललेल्या चाचणीत तीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिच्या खेळाची दखल घेऊन निवड समितीने तिला भारतीय संघात स्थान दिले. सराव शिबिरातही वैष्णवीने रग्बीसाठी लागणारे अंगभूत कौशल्य दाखवून दिले. त्यामुळेच तिला आशियाई स्पर्धेतील सर्व सहाही सामने खेळण्याची संधी देण्यात आली. तिनेही मिळालेल्या संधीचे सोने करत मैदानात आपल्या फॉरवर्ड प्लेसवरुन भारतीय संघासाठी बहारदार खेळ केला. शिवाय कौशल्यपूर्ण पासिंगमुळे भारतीय संघाला सामने जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. वैष्णवीला कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे पेट्रन-इन-चीप मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, अध्यक्ष अमर सासने व प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.