चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाब पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना शस्त्रसाठय़ासह अटक केली आहे. हे तीन दहशतवादी पंजाब येथील मोगा जिल्हय़ाचे रहिवासी आहेत. कुलविंदर सिंह, कमलप्रीत सिंह आणि कंवरपाल सिंह अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून एक विदेशी पिस्तूल, 11 राउंड, एक ग्रेनेड आणि एक आयईडी स्फोटके जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक स्विफ्ट गाडीही जप्त केली आहे. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला वेळेत टळला आहे. पंजाबच्या तरनतारण जिल्हय़ात पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आहे.