35 अपिले स्वीकारली, 14 फेटाळली : आमदार नितेश राणे यांची संस्था अपात्र
- कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे निवडणूक निर्णय अधिकारी
- महिनाभरात निवडणूक तारीख जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 982 जणांची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारुप यादीवरील 59 अपिलांपैकी 35 अपिले स्वीकारून 14 अपिले फेटाळून लावण्यात आली. आमदार नीतेश राणे यांची संस्था जिल्हा बँकेचे 13 कोटीचे थकित कर्ज भरू न शकल्याने प्रारुप यादी बनवतानाच मतदार यादीतून अपात्र ठरविण्यात आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक महिनाभरातच लागणार असून त्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत मे 2020 मध्येच संपली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाला सहावेळा मुदतवाढ मिळत गेली. त्यानंतर दीड वर्षानंतर आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले असून सहकार खात्याकडून निवडणूकपूर्व तयारी सुरू आहे. मतदार यादी तयार करण्याचे काम सहकार निवडणूक प्राधिकरणाने केले आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व जिल्हा बँक अधिकारी यांनी प्रथम 1 हजार 19 जणांची प्रारुप मतदार यादी जाहीर केली होती. त्यावर 49 हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन त्यातील 35 हरकती मान्य करून त्या संस्था प्रतिनिधांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. तर 14 हरकती फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता 982 जणांची अंतिम मतदार यादी निश्चित करून जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मनीष सांगळे यांनी दिली.
सात मतदारसंघात 982 मतदार
982 मतदारांमध्ये सहकारी शेती पतपुरवठा, विविध कार्यकारी संयुक्त शेती, फळबागा, विकास धान्य पेढय़ा सभासद असलेल्या मतदारसंघात 229 सभासद मतदार तसेच नागरी सहकारी बँक, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था मतदार संघात 140 सभासद मतदार, सहकारी पणन संस्था, शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघात 71 सभासद, मतदार औद्योगिक संस्था, मजूर संस्था, जंगल कामगार संस्था, मोटार वाहतूक संस्था मतदार संघात 160 सभासद मतदार, मच्छीमार संस्था, दुग्ध संस्था, कुक्कुट पालन, वराह पालन, जनावरे पैदास करणाऱया संस्था मतदार संघात 59 सभासद मतदार, विणकर संस्था, घर बांधणी संस्था, देखरेख संस्था व इतर सहकारी संस्था मतदार संघात 123 सभासद मतदार आणि बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद संस्था मतदार संघात दोनशे मतदार असे एकूण 982 मतदार निश्चित मतदार निश्चित करण्यात आले आहेत.
कुडाळ, सावंतवाडी तालुक्मयात सर्वाधिक मतदार
कुडाळ व सावंतवाडी तालुक्मयात सर्वाधिक मतदार आहेत. कुडाळ तालुक्मयात 213, तर सावंतवाडी तालुक्मयात 212 मतदार आहेत. तसेच देवगड तालुक्यात 83, दोडामार्ग – 48, कणकवली – 166, मालवण – 110, वैभववाडी – 54 आणि वेंगुर्ले – 54 असे एकूण 982 मतदार निश्चित झाले आहेत.
कुडाळ प्रांताधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महिनाभरातच म्हणजे ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ात निवडणूक होऊ शकते. त्याकरिता सहकार निवडणूक प्राधिकरणाने कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक रणधुमाळी सुरू
जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढणार, असे जाहीर केले आहे. तर भाजप कशा पद्धतीने लढणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आमदार नीतेश राणेंची संस्था थकबाकीदार असल्याने अपात्र
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेने आमदार नीतेश राणे यांना प्रतिनिधी म्हणून नेमले होते. परंतु, आमदार राणेंच्या संस्थेचे 13 कोटी 29 लाख रुपये थकित असल्याने थकबाकीदार म्हणून नीतेश राणे यांना प्रारुप यादीतूनच अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर थकित रक्कम भरून यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अपील करण्याची संधी होती. मात्र त्यांनी थकित रक्कम न भरल्याने ते अपील करू शकले नाहीत. त्यामुळे मतदार यादीतील त्यांच्या संस्थेची अपात्रता कायम राहिली.