फिर्यादीदार न्यायालयात उपस्थित राहण्यास टाळाटाळ
प्रतिनिधी /बेळगाव
लोकसभेच्या निवडणुका 2013 मध्ये झाल्या. त्यावेळी म. ए. समितीच्यावतीने नोटाला मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. त्याबाबतची परिपत्रके म. ए. समितीचे मधू कणबर्गी हे वाटत होते. मात्र खडेबाजार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी येथील तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी फिर्यादीदार उपस्थित राहण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी खडेबाजार पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी भाषिकांनी नोटाला मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार धर्मवीर संभाजी चौक व परिसरात मधू कणबर्गी हे परिपत्रके वाटत होते. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी 2013 पासून सुरू आहे. मात्र त्यावेळचे निवडणूक अधिकारी न्यायालयात उपस्थित राहण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हा खटला पुन्हा पुढे ढकलत आहे. यामुळे ऍड. महेश बिर्जे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तसेच हा खटला रद्द करावा, अशी मागणी केली.
तिसरे जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश खडेबाजार पोलिसांना संबंधित फिर्यादीदाराला हजर करा, अन्यथा तुमच्यावरच कारवाईचा बडगा उगारू, असे सुनावले. एकूणच खडेबाजार पोलिसांची चांगलीच खरडपट्टी न्यायाधीशांनी काढली आहे. पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मधू कणबर्गी यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे आणि ऍड. शंकर पाटील हे काम पाहत आहेत.