नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर नाराज असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh Former Chief minister of Punjab) यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पुढच्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. अमरिंदर सिंग यांनी बुधवारी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval National Security Advisor of India) यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्या तरी अमरिंदर सिंग यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून गांधी घरण्याशी एकनिष्ट आणि विश्वासू असलेले अमरिंदर सिंग यांनी बंड केल्यास काँग्रेसला (Congress) मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. बुधवारी अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाली आहे. आता अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही कागदपत्रं नक्की कशासंदर्भात आहेत याबद्दल खुलासा होऊ शकतेलेला नाही. भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या पंजाबसारख्या राज्यामध्ये काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) सारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देणं हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची टीका अमरिंदर सिंग यांनी यापूर्वी केली होती.