कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड व तानंग येथे राहणाऱ्या दोन तरूणांनी वेगवेगळ्या कारणातून राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. दोन्ही घटनेबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तानंग येथे राहणाऱ्या शिदगोंडा मलगोंडा राजमाने ( ३५) हा तरुण काही दिवसांपासून आजारी होता. या तरुणाने आजाराला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरातील जिन्याच्या लोखंडी ॲगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
तसेच कुपवाड शहरात रामकृष्णनगर येथे राहणाऱ्या संदीप गोंविद चव्हाण (१९) या तरुणाने शुक्रवारी रात्री घरात कोणी नसल्याचे पाहून पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. संदीप चव्हाणचे आई वडील गावाला गेले होते. त्यामुळे तो घरी एकटाच होता. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.