भंवरी देवी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱया भंवरी देवी अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी माजी मंत्री महिपाल मदेरणा यांचे निधन झाले आहे. अशोक गेहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या मदेरणा यांनी तुरुंगात रहावे लागले होते. अटक झाल्यावर त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. 9 वर्षांपर्यंत तुरुंगात राहिल्यावर 24 ऑगस्ट रोजीच त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.
याप्रकरणी तुरुंगात कैद आरोपींमध्ये सामील भंवरी देवीचा पती अमरचंद तसेच मदेरणा यांच्यासह 7 जणांना जामीन मिळाला होता. तत्कालीन आमदार मलखान सिंह यांच्यासह एकूण 17 आरोपी कैदेत होते. आता केवळ मलखान यांची बहिण इंद्रा विश्नोई यांना जामीन मिळू शकलेला नाही.
‘फिल्मी’ कहाणी
जोधपूरच्या आरोग्य उपकेंद्रात सहाय्यक परिचारिका असलेली भंवरी देवी राजस्थानी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी शूटिंगवर जायची. सेवेवरून गायब राहिल्याने तिला निलंबित करण्यात आले होते. पण मलखान सिंह आणि मंत्री महिपाल मदेरणाच्या मदतीने निलंबन रद्द करविले होते. तेथूनच तिघांमधील संपर्क अन् भंवरी देवीची राजकारणातील उत्सुकता वाढली. निवडणूक लढण्यासाठी तिकीट न मिळाल्याने तिघांमध्ये वाद झाला होता. अडचणी वाढल्याचे पाहून मलखान आणि मदेरण यांनी भंवरी देवीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. एक सीडी देखील समोर आल्याने राजस्थानच्या राजकारणात वादळ उभे राहिले.
अपहरण अन् हत्या
याचदरम्यान भंवरी देवी अचानक गायब झाली. याप्रकरणी महिपाल मदेरणा आणि काँग्रेस आमदार मलखान सिंह बिश्नोई यांच्यावर हत्येचा आरोप केला जाऊ लागला. भंवरी देवी या दोघांनाही ब्लॅकमेल करत होती असे बोलले जाते. राष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आली होती.
एफबीआयची मदत
भंवरी देवीकडून सीडी प्राप्त करण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले. तिने आरडाओरड सुरू केल्याने घाबरलेल्या गुंडांनी तिची गळा दाबून हत्या केली होती. तसेच मृतदेह जाळला होता. कालव्यात शोध घेतल्यावर सीबीआला अस्थी मिळाल्या होत्या. सीबीआयने भंवरी देवीच्या मुलांचे डीएनए अमेरिकेला तपासणीसाठी पाठविले होते. अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने या अस्थी भंवरी देवीच्याच होती अशी पुष्टी दिली होती.