पंढरपूर / प्रतिनिधी
आळंदी’ देहू -पंढरपूर या पालखी मार्गाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपुरात येऊ शकतात. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा 30 ऑक्टोंबर रोजीचा नियोजित दौरा आहे. परंतु आता गडकरीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पंढरपुरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा जर निश्चित होत असेल तर कदाचित नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालखी मार्गाचे भूमिपूजन होऊ शकते. याबाबत देखील सध्या प्रशासकीय पातळीवर आणि भाजपच्या वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंढरपूर दौरा जर निश्चित झाला तर ते पंढरपूर शहरात दुसऱ्यांदा आणि सोलापूर जिल्ह्यात पाचव्यांदा येतील.