ग्राहकांना गृहकर्ज मिळण्यासाठी नवी योजना उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिया पोस्ट पेमेन्ट बँक (आयपीपीबी) आणि एचडीएफसी यांनी पेमेन्ट बँकेच्या जवळपास 4.7 कोटी ग्राहकांना गृहकर्ज देण्यासाठी एक नवी योजना आखली असून याकरीता दोघांमध्ये करारही झाला असल्याची माहिती आहे.
यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या एका माहितीनुसार आपल्या देशभरातील 650 शाखांच्या मदतीने आणि 1.36 लाखपेक्षा अधिक बँकिंग ऍक्सेस पाँईट (पोस्ट कार्यालये) यांच्या मदतीने एचडीएफसीची गृहकर्ज उत्पादने संपूर्ण भारतामधील ग्राहकांपर्यंत पोहचणार आहेत. आयपीपीबी आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्यामध्ये सोमवारी योजना तयार करण्यात आली व एका करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत.
आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक जे.वेंकटरामू यांनी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांना आर्थिक कर्ज उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. त्यामुळे ही नवी योजना ग्राहकांना लाभदायक ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दुसऱया बाजूला एचडीएफसीच्या रेणु सूद कर्नाड या भागीदारीवर बोलताना म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना घरे या महत्त्वाकांक्षी मोहिमेला हातभार लावण्यासाठी इच्छुकांना सवलतीत गृहकर्ज दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.